BMC
BMC Tendernama
मुंबई

आश्चर्यच! मुंबईतील नालेसफाईची मुदतीआधी मोहिम फत्ते

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील नालेसफाई 31 मेच्या आधीच आठवडाभर आधीच पूर्ण झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. महापालिकेने निश्चित केलेल्या 9 लाख 79 हजार 882 मेट्रिक टन गाळापैकी आज दुपारी 12 काजेपर्यंत 9 लाख 84 हजार 927 मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्धिष्टाच्या 100.51 टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

नालेसफाई परिणामकारक होण्यासाठी छायाचित्रण व चित्रफीत तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर डंपिंग ग्राऊंडवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची, वेळेची नोंद करणे, डंपिंग ग्राऊंडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी ठेकेदारांकडून करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो, तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ काढण्याचे उद्धिष्ट निश्चित केले जाते. गाळ काढण्याच्या कामांना 6 मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती, तर काम पूर्ण करण्यासाठी 31 मेची मुदत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये विहित मुदतीपूर्वीच नाल्यातून गाळ काढण्याचे 100 टक्के उद्धिष्ट गाठण्यात आले आहे. मात्र उद्धिष्ट गाठले असले तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले. गाळ काढला असला तरी नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांना आपल्या विभागातील नालेसफाईच्या कामाचे फोटो टाकण्यासाठी 25 मेपासून कार्यान्वित होणारी वेबसाईट मात्र अजून सुरु झालेली नाही.

विभागनिहाय अशी झाली नालेसफाई-
मुंबई शहर 35,776.30 मेट्रिक टन
पूर्व उपनगर 1,19,935.61 मेट्रिक टन
पश्चिम उपनगर 1,95,546.08 मेट्रिक टन
मिठी नदी 1,96,478.09 मेट्रिक टन
छोटे नाले 3,86,892.76 मेट्रिक टन