BMC
BMC Tendernama
मुंबई

Mumbai : ब्रिटीशकालीन 3 पुलांवर लवकरच महापालिकेचा हातोडा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील गोखले पूल पाडल्यानंतर आणखी ३ ब्रिटीशकालीन पूल पाडण्याची महापालिकेची योजना आहे. १०० वर्षे पूर्ण झाले असल्याने हे पूल रहदारीसाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे महापालिकेने हे पूल पाडून त्यांच्याजागी नवे पूल बांधण्याचे ठरवले आहे. दादरचा टिळक पूल, प्रभादेवी स्थानकावरील पूल आणि मुंबई सेंट्रलमधील पूल अशा या तीन पुलांवर लवकरच हातोडा पडणार आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोडला जोडणाऱ्या बेलासिस पुलासाठी 2.57 कोटींची रक्कम दिली आहे. हा पूल 1893 साली बांधण्यात आला होता. दादरचा टिळक पूल आणि प्रभादेवी स्थानकावरील पुलासाठी पश्चिम रेल्वेने प्रत्येक 1 लाख रुपये दिले आहेत. हे पैसे मिळाले असले तरी या पुलांचे तातडीने पाडकाम सुरू होईल असे नाही. पैशांची तरतूद ही भविष्यात काम सुरू होणार असल्याचे संकेत देणारी असल्याचे रेल्वेतील उच्चपदस्थांनी सांगितले.

या पुलांच्या पाडकामात आणि पुन्हा उभारणीत विविध सरकारी यंत्रणा एकत्र येणार आहेत. या यंत्रणांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई महापालिका, महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचा समावेश आहे. दादर येथील टिळक पूल पाडून तिथे केबल स्टेड तंत्रज्ञानावर आधारीत पूल बांधण्यात येणार आहे. प्रभादेवी पुलावरून ये-जा करणे हे वाहनचालकांसाठी मोठे दिव्य आहे, या पुलावरून दोन्ही दिशांकडून एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. यामुळे या पुलाच्या जागेवर मोठा पूल उभारणे गरजेचे आहे, हे एक मोठे आव्हान आहे.