मुंबई (Mumbai): पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडले जाणार आहे. या दोन्ही विमानतळांना जोडणारा हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग ठरणार आहे.
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका 34.89 किमी लांबीची असून, त्यावर एकूण 20 स्थानके असतील. ही मार्गिका नवी मुंबईतील नेरूळ आणि सीवूड्स रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे.
मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडको संयुक्तपणे करणार होती; परंतु नगरविकास विभागाने 27 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार ही मार्गिका सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारली जाणार आहे. आराखडा तयार करून निविदा राबवण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली आहे. सिडकोने हा आराखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला असून या, ऑक्टोबर महिन्यातच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
मेट्रो 8 मार्गिकेवर मुंबई विमानतळ टी2 (भुयारी), 2) फिनिक्स मॉल (भुयारी), 3) एसजी बर्वे मार्ग (भुयारी), 4) कुर्ला (भुयारी), 5) लोकमान्य टिळक टर्मिनस (भुयारी), 6) गरोडिया नगर (भुयारी), 7) बैंगनवाडी (उन्नत), 8) मानखुर्द (उन्नत), 9) आएसबीटी (उन्नत), 10) वाशी (उन्नत), 11) सानपाडा (उन्नत), 12) जुईनगर (उन्नत), 13) एलपी (उन्नत), 14) नेरूळ स्थानक (उन्नत), 15) सीवूड्स स्थानक (उन्नत), 16) अपोलो (उन्नत), 17) सागर संगम (उन्नत), 18) खारघर (उन्नत), 19) नवी मुंबई विमानतळ पश्चिम (उन्नत), 20) नवी मुंबई विमानतळ टी2 (उन्नत) ही 20 स्थानके असणार आहेत.
यापैकी मुंबई विमानतळ टी2, फिनिक्स मॉल, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, गरोडिया नगर ही स्थानके भूमिगत असतील, तर उर्वरित मार्गिका उन्नत स्वरूपात उभारली जाईल. विशेष म्हणजे, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मेट्रो 8 मार्गिका रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे विविध जिल्ह्यांमधील प्रवाशांना रेल्वेमार्गे मेट्रोपर्यंत आणि मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत सहज पोहोचता येईल.