मुंबई (Mumbai) : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणारा प्रकल्प खासगी विकासकाच्या सहभागातून राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन विमानतळांना मुंबई मेट्रो मार्ग-८ ने जोडण्यात येणार असून, सुमारे ४० किलोमीटरचे हे अंतर मेट्रोमुळे सुमारे ३० मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे १५ ते २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
भविष्यातील रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या मार्गिकेचे मुंबईतील काम 'एमएमआरडीए' तर नवी मुंबईतील काम 'सिडको'च्या माध्यमातून केले जाणार होते. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी 'एमएमआरडीए'वर सोपविण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने प्रकल्पाचा आराखडा तयार करताना त्यावर १५ ते २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. 'एमएमआरडीए' या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया राबविण्याच्या तयारीत असतानाच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मे २०२४ च्या बैठकीत या मार्गिकेचा बहुतांश भाग नवी मुंबईतून जात असल्याने 'सिडको'नेच प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करावा असा निर्णय घेतला. तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर (पीपीपी) म्हणजेच विकासकाच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 'एमएमआरडीए'ने मुंबई मेट्रो मार्ग-८ प्रकल्पासंदर्भातील सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल या संबंधीची प्राधिकरणाकडील माहिती व कागदपत्रे तत्काळ सिडकोकडे सुपूर्द करावीत असे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावर सात स्थानके असणार आहेत. तसेच, दररोज नऊ लाख प्रवाशांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. प्रस्तावित मार्गानुसार ही मार्गिका अंशत: भूमिगत असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे दरम्यान हा मार्ग भूमिगत असणार आहे. तर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असणार आहे.