Mumbai Metro 3
Mumbai Metro 3 Tendernama
मुंबई

मुंबई मेट्रो-3 : 'या' तारखेला धावणार पहिली प्रोटोटाइप मेट्रो

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो तीनची (Mumbai Metro 3) पहिली प्रोटोटाइप ट्रेन अखेर पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रो तीनची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.

मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी मेट्रोच्या सारीपूत नगर स्थानक येथील ट्रेन वितरण क्षेत्रांची पाहणी केली आणि स्थानके, बोगदे व यंत्रणांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मेट्रो तीनच्या कामाच्या प्रगती संदर्भात त्या म्हणाल्या की, मुंबई मेट्रो तीनची पहिली प्रोटोटाइप ट्रेन ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू होईल. सुरवातीच्या डिझाईनची क्षमता सिद्ध करणारी ही चाचणी बोगद्याच्या आत घेतली जाईल. जेणेकरून मेट्रोची क्षमता नीट पाहिली जाईल.

मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत कधी दाखल होणार याबाबतची नेमकी तारीख मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनीने भिडे यांनी सांगितली नसल्याने त्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ऑगस्ट २०२२ मध्ये मेट्रो सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान ट्रॅफिकने कंटाळलेल्या मुंबईकरांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनीने भिडे यांनी बोगद्यासह ट्रेन रिसीव्हिंग सुविधेला भेट दिली आणि सहकाऱ्यांसोबत स्टेशन्सच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या पुनर्नियुक्ती पदाबाबत आनंद व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, एमडी एमएमआरसीएल या पदावर माझी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी मला दिलेल्या आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छांबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्यांचा माझ्यावर आणि आमच्या एमएमआरसीएल टीमवरील हे प्रेम आणि विश्वास आहे. ज्यामुळे आमची उर्जा आणि मनोबल वाढते. त्यांच्या विश्वासाला आमच्या मेहनतीने न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रोच्या कामाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे होती. शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्यावरून मतभेद झाले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच भिडे यांची बदली करण्यात आली. कोरोना व्यवस्थापन आणि मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नेमणूक केली होती. मात्र राज्यात नव्याने सत्तांतर होताच पुन्हा एकदा भिडे यांची वर्णी मेट्रोमध्ये लावण्यात आली आहे.