<div class="paragraphs"><p>Mumbai</p></div>

Mumbai

 

Tendernama

मुंबई

मुंबई विमानतळावर तासाला 'इतक्या' विमानांचे लँडिंग-टेकऑफ शक्य

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई विमानतळावर लवकरच दिल्लीप्रमाणेच अत्याधुनिक ऑटोमोटेड एअर ट्रॅफिक सिस्टम बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे दोन विमानांतील अंतर तीन नॉटिकल मैलापर्यंत कमी राखणे शक्य होणार आहे. या यंत्रणेसाठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार असून ती कार्यान्वित झाल्यास दर तासाला 48 हून अधिक विमानांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

मुंबई विमानतळावर दिवसात 1000 विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग होत असते. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकींना छेदत असल्याने एका वेळी एकाच धावपट्टीचा वापर करावा लागतो. त्यामुळे विमानांची वाहतूक करणे जिकिरीचे असते. तरीही 2018 साली मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीचे बंधन असतानाही एका दिवसात तब्बल 1003 विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम झाला होता. आता मुंबई विमानतळावर दिल्लीप्रमाणेच आधुनिक ऑटोमोटेड एअर ट्रॅफिक सिस्टम प्रणाली विकसित केली जात असून तिच्यासाठी टेंडर मागविले जात असल्याचे एअर ट्रफिक कंट्रोलर्स गिल्ड इंडिया वेस्टर्न रिजनचे रिजनल सेक्रेटरी सैफुल्लाह यांनी सांगितले.

एअर ट्रफिक कंट्रोल यंत्रणेला 22 फेब्रुवारी रोजी 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एअर ट्रफिक कंट्रोलरच्या संघटनेने भविष्यातील आव्हानासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुंबई विमानतळावर लवकरच दिल्ली विमानतळाच्या धर्तीवरील आधुनिक ऍडव्हान्स सरफेस मूव्हमेंट गायडन्स कंट्रोल सिस्टम (एएसएमजीसीएस) यंत्रणा बसविण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास विमानतळाच्या विमानांचे ट्रफिक हाताळण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. त्यामुळे दर तासाला 48 पेक्षा जास्त विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ करणे शक्य होणार आहे. 5 जून 2018 साली मुंबई विमानतळाने एकाच दिवशी विक्रमी 1003 विमानांचे ट्रफिक हाताळले होते.

कोविडच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी अजूनही कायम असून घरगुती उड्डाणांमुळे दिवसाला 700 विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सुरू असून एअर ट्रफिकमध्ये कोरोनापूर्व काळापेक्षा 30 टक्के घट झाली आहे. सध्या इस्रोच्या 'गगन' या उपग्रहाच्या मदतीने विमानांचे ट्रफिक कंट्रोल केले जात आहे. हा 'गगन' उपग्रह आपला देशच नव्हे तर सीमापार आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया या देशांना सेवा पुरवत आहे. नवीन ऑटोमेटेड यंत्रणा लागू झाल्यानंतर दोन विमानांतील अंतर तीन नॉटिकल मैलापर्यंत कमी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विमानांना लवकर सिग्नल मिळून इंधनाची बचत होईल व विमाने हाताळण्याची एअरपोर्टची क्षमता वाढेल. सध्या देशाच्या हवाई क्षेत्राची जबाबदारी 3162 एअर ट्रफिक कंट्रोलर सांभाळीत असून त्यात 16 टक्के महिला आहेत. तर 2880 ट्रफिक कंट्रोलरना डीजी सिव्हिल एव्हिएशनचे लायसन्स आहे. भविष्यात ड्रोन आणि एअर ट्रक्सींचे ट्रफिक हाताळण्याची जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू, असेही सैफुल्लाह यांनी सांगितले.

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी जिला रन वे-27 म्हणतात. तिचाच वापर करून विमानाचे उड्डाण होते. कारण दुसरी धावपट्टी तिला छेदणारी असून वार्याच्या दिशेमुळे दुसरी धावपट्टी वापरणे शक्य नसून एकावेळी एक धावपट्टी वापरता येते. दिल्लीला दोन स्वतंत्र धावपट्ट्या असून एकाच वेळी एक उड्डाणासाठी तर दुसरी लँडिंगसाठी वापरली जाते. तसेच तिसरी धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. अटलांटा विमानतळावर पाच ते सहा धावपट्ट्या आहेत. मुंबईत एकच मुख्य 'रन वे -27' वापरात असून दिवसाला एक हजार विमानांचे उड्डाण किंवा लँडिंग होत असते. एकच धावपट्टी असून सर्वाधिक विमानांचे ट्रॅफिक हाताळण्यात मुंबई विमानतळाचा देशात दुसरा क्रमांक आहे.