Dharavi, Adani
Dharavi, Adani Tendernama
मुंबई

'अदानी' धारावी पुनर्विकासातून 3 लाख कोटी कमावणार? 'आप'चा घणाघात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जगातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास (Dharavi Redevelopment Project) होणार आहे. या पुनर्विकासात अदानी समूहाला (Adani Group) १० कोटी चौरस फूट विकास हक्क ५,०६९ कोटी रुपयांना मिळत आहेत. यापैकी सहा कोटी चौरस फूट क्षेत्रफळ अदानीला विक्रीसाठी मिळत आहे, ज्यातून ते सुमारे ३ लाख कोटी रुपये कमवणार आहेत. या प्रकल्पातून मोठा पैसा मिळणार आहे. मग धारावी प्रकल्पात कोणाची भरभराट होणार स्थानिक रहिवासी की अदानी? असा सवाल आम आदमी पक्षाच्या (AAP) मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे.

शर्मा म्हणाल्या की, पुनर्विकासासाठी धारावीतील रहिवाशांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, परिणामी प्रकल्पाला विरोध होत आहे. पुनर्विकास आराखड्यात लघु उद्योग मालक आणि गृह-आधारित व्यवसायांसाठीच्या धोरणाबाबतही स्पष्टतेचा अभाव आहे.

प्रकल्पात लोकप्रतिनिधी आणि विकास आराखड्यात पारदर्शकता आणावी, अशी धारावीतील नागरिकांची मागणी आहे. सध्याच्या परिस्थितीच्या आधारे असे दिसते की अदानी समूह रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांकडे लक्ष देणार नाही आणि त्यामुळे ‘अदानी हटवा, धारावी वाचवा’ ही आमची मागणी आहे, असे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातील सर्वांत मोठा जमीन घोटाळा आहे. अदानी समूहाला १० कोटी चौरस फूट विकास हक्क ५,०६९ कोटी रुपयांना मिळत आहेत. तसेच सरकारच्या पैशातून रेल्वेची अतिरिक्त जमीन मिळत आहे. या भागातील शेवटचे सर्वेक्षण २००८ मध्ये करण्यात आले होते आणि संरचनेची पात्रता तारीख १ जानेवारी २००० ठेवण्यात आली होती. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) नुसार ती २०११ आहे. जर सरकारला खरोखरच धारावीचा पुनर्विकास करायचा असेल तर नवीन सर्वेक्षण केले पाहिजे असे मत स्थानिक रहिवाशी व आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष संदीप कटके यांनी व्यक्त केले.

धारावी मधील ८० टक्के लोक स्थानिक युनिट्स आणि व्यवसायांवर अवलंबून आहेत, जे संरक्षित करणे गरजेचे आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाला धारावीबाहेर पाठवू नये. अदानीला सहा कोटी चौरस फूट क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळत आहे, ज्यातून ते किमान ३,००,००० कोटी रुपये कमवणार आहेत. या प्रकल्पातून मोठा पैसा मिळणार आहे. मग धारावी प्रकल्पात कोणाची भरभराट होणार स्थानिक रहिवासी की अदानी, असा प्रश्न संदीप कटके यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

धारावीतील कोळीवाडे वाचले पाहिजेत त्याच्यासाठी वेगळी योजना तयार करावी. कुंभार वाड्यातील लोकांना ४ एफ.एस.आय. प्रमाणे स्वतंत्र जागा देण्यात यावी. अशा सगळ्या धारावीकरांच्या मागण्यांचा विचार करून त्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणी संदीप कटके यांनी पत्रकार परिषदेत केली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी प्रमुख मागण्या...

1. धारावीत सर्वांसाठी ४०५ चौरस/फूट मोफत घर देण्यात यावे.

2. नवीन सर्वेक्षण केले पाहिजे आणि सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस पात्रतेसाठी कट ऑफ डेट असायला हवा.

3. क्षेत्राचे काम पूर्णपणे सुरू करण्यात यावे.

4. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन लोकांसाठी प्रसिद्ध केला जावा.

5. टाटा पॉवर नगर, राजीव गांधी नगर, प्रेम नगर येथील झोपडपट्टीचा प्रकल्पात समावेश केला जावा आणि धारावीतच प्रकल्पाअंतर्गत मोफत घरे देण्यात यावी.

6. लघु उद्योगासाठी आराखडा प्रकाशित करण्यात यावा त्यामध्ये चामडे, वस्त्र, प्लास्टिक, मातीची भांडी इ. सर्व उद्योग असावेत.

7. धारावीमध्ये अपात्र सदनिकांसाठी भाडे योजनेचे पुनर्वसन करण्यात यावे.

8. निवासी सोसायटी यांना कॉर्पस फंड दिला जावा.

9. खाजगी जमीन मालकांना रास्त भाव दिला जावा.

10. कुंभारवाडा आणि धारावी कोळीवाड्यातील रहिवाशांना विशेष तरतुदीसह विकासासाठी विचारात घेतले जावे.

11. परिशिष्ट II प्रथम प्रकाशित केले जाईल नंतर विकास काम सुरू झाले पाहिजे.

12. प्रकल्पाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे.

13. धारावीच्या जमिनीवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यात यावी.

14. धारावीतील सर्व रहिवाशांना धारावी मध्येच मोफत घरे दिली जावी.

15. माहीम निसर्ग उद्यान विकासातून वगळण्यात यावे.

16. धारावीमध्ये व्यावसायिक गाळे आणि कारखान्यांचे पुनर्वसन केले जावे.

17. धारावी रहिवाशांची समिती स्थापन केली जावी.