Mumbra Bridge
Mumbra Bridge Tendernama
मुंबई

Mumbai : पलावा ते काटई उड्डाणपुलाची एक मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण शीळ महामार्गावरील पलावा ते काटई उड्डाणपुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू केली जाणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कल्याण शीळ महामार्ग हा कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढील शहरांना ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडत असल्याने महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पलावा जंक्शनवरील वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने देसाई खाडी ते काटई असा उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी भूसंपादनात अडथळे आल्याने हे काम अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेत या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला.

सद्यस्थितीत या पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून रेल्वेने सुद्धा पुलाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. उड्डाणपुलाचे स्टील स्ट्रक्चर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून गर्डर लाँचिंग केल्यानंतर इतर कामांना वेग येऊ शकणार आहे. बीपीसीएलमुळे पुलाच्या कामात आलेले अडथळे दूर करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये दुसरी मार्गिका सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न असणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या एमएसआरडीसी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस. के. सुरवसे उपस्थित होते.