Mumbai Tendernama
मुंबई

ठाकुर्ली पुलाचे उर्वरित बांधकाम एमएमआरडीए करणार; २३ कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद केल्यानंतर कोपर उड्डाण पुलावर येणारा वाहतुकीचा भार हलका करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी ठाकुर्ली उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. या अर्धवट उड्डाण पुलाच्या उर्वरित बांधकामाचा आर्थिक भार आता एमएमआरडीएच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. केडीएमसीने या पुलाच्या उभारणीवर सुमारे २४ कोटी खर्च केले आहेत. पुढील बांधकामासाठी देखील सुमारे २३ कोटींची आवश्यकता आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती तोळामासा असल्याने पुढील बांधकाम एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. एमएमआरडीए लवकरच यासंदर्भातील प्रक्रिया सुरु करणार आहे.

ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डोंबिवली शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. शहरात पूर्व पश्चिमेला ये-जा करण्यासाठी कोपर उड्डाण पूल हा एकमेव पूल होता. त्यावर वाहतुकीचा भार येऊ नये, म्हणून ठाकुर्ली उड्डाण पूल बांधण्यात आला. २०१६ मध्ये भूमिपूजन केल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने रेल्वेच्या मदतीने दोन वर्षांत या पुलाचे काम पूर्ण केले. हा पूल झाल्याने कल्याणहून डोंबिवली पश्चिमेला जाणारी अवजड वाहने ठाकुर्ली उड्डाण पुलावरून जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु हा पूल अरुंद असल्याने येथे अवजड वाहने आल्यास कोंडीची मोठी समस्या निर्माण होते.

डोंबिवली पूर्व पश्चिमेतील वाहने कल्याण येथे जाण्यासाठी चोळेगावातील मार्गाचा वापर करतात. या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलाला जोडून पुलाची उभारणी करत हा पूल थेट ९० फीट रोडवरील म्हसोबा चौक येथे उतरविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने आखले. त्यानुसार पुलाची बांधणीही सुरू केली. स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली जंक्शन हे नेहरू रोडवर पुलासाठी २१ खांब उभारत जंक्शनपर्यंतचा पूल या वर्षातच पूर्ण करण्यात आले आहे. ठाकुर्ली जंक्शन ते म्हसोबा चौक येथील पुलाच्या मार्गात अनेक नागरिक बाधित होत आहेत. या बाधितांचे पुनर्वसन, जागा हस्तांतराची प्रक्रिया अद्याप पालिकेच्या वतीने सुरू आहे. आता अर्धवट पुलाचे काम एमएमआरडीएकडून पूर्ण केले जाणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात हा पूल पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

चोळेगाव येथील रस्ता हा अरुंद असून गेले अनेक वर्षे रस्त्याची डागडुजी न झाल्याने हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. पावसाळ्यात नागरिकांना वाहनचालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रेल्वे समांतर रस्ता, ९० फिट रोड, चोळेगाव येथे मानवी वस्ती झपाट्याने वाढत असून ठाकुर्ली रेल्वेस्थानक, तसेच डोंबिवली जाण्यासाठी चोळेगावातील रस्ताच महत्त्वाचा असून ठाकुर्ली उड्डाण पुलाचे म्हसोबा चौकापर्यंत काम झाल्यास वाहन कोंडी होणार नाही.

एमएमआरडीएतर्फे उर्वरित पुलाचे काम केले जाणार आहे. पुलासाठी आवश्यक जागा मोकळी करून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. सहायक आयुक्तांकडून जागेचा सर्व्हे व जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महापालिका