MMRDA
MMRDA Tendernama
मुंबई

'त्या' सोसायटी दुरुस्तीसाठी 15 दिवसांत वर्क ऑर्डर; 52 कोटीचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पनवेल येथील कोनमधील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या रखडलेल्या दुरुस्तीच्या कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. घरांच्या दुरुस्तीसाठी मागविण्यात आलेले टेंडर १५ दिवसांत अंतिम करण्यात येणार आहे. सुमारे ५२ कोटी रुपये खर्च करून घरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ११ इमारतींमधील सदनिकांच्या दुरुस्तीसाठी ११ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

पनवेल येथील कोनमधील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र अजूनही विजेत्या गिरणी कामगारांना घरांचा ताबा मिळालेला नाही. विविध कारणांमुळे विजेत्यांना घरांचा ताबा देता आलेला नाही. असे असतानाही अनेक विजेते कामगार गृहकर्जाचा मासिक हप्ता भरत आहेत. ताबा रखडला असताना म्हाडा आणि एमएमआरडीएमध्ये गेले वर्षभर घरांच्या दुरुस्तीच्या खर्चावरून वाद सुरू आहे. या वादामुळे ताबा प्रक्रिया आणखी लांबली आहे. अखेर म्हाडाने कामगारांचे हित लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चाचा वाद बाजूला ठेवून दुरुस्तीसाठी मार्चमध्ये टेंडर काढण्यात आले होते. सुमारे ५२ कोटी रुपये खर्च करून घरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मात्र हा खर्च एमएमआरडीएकडून वसूल करण्यात येणार आहे. या घरांच्या वितरणातून मिळणाऱ्या रकमेतून ५२ कोटी रुपये वळते करून घेण्यात येणार आहेत.

मुंबई मंडळाच्या घरांच्या दुरुस्तीसाठी जारी केलेल्या टेंडरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ११ इमारतींमधील सदनिकांच्या दुरुस्तीसाठी ११ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तांत्रिक टेंडरची छाननी सुरू असून आता आर्थिक टेंडर खुले केले जाईल आणि दोन आठवड्यात टेंडर अंतिम करून कार्यादेश जारी केले जातील, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कार्यादेश जारी झाल्यानंतर मे महिन्यापासून कामाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. हे काम सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र असे असले तरी शक्य तितक्या लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून कामगारांना घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न आहे.