Eastern Express Highway
Eastern Express Highway Tendernama
मुंबई

मुंबईतील 'एक्स्प्रेस वे'वरच्या खड्ड्यांसाठी किती कोटींचे टेंडर?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील पूर्व (Eastern) आणि पश्चिम (Western Express Way) द्रुतगती महामार्गावर दरवर्षी पडणारे खड्डे (Potholes) आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी (Traffic) दूर करण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या कामासाठी किती कोटींचे टेंडर (Tender) निघणार याकडे ठेकेदारांचे डोळे लागले आहेत.

पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. या दोन्ही मार्गांची दुरुस्तीवर एमएमआरडीए कोट्यावधी रुपये खर्च करते. यानंतरही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. दरवर्षी होणारा खर्च आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील माहीम जंक्शन ते दहिसर चेक नाका दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या निर्णयाला प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील सायन जंक्शन ते गोल्डन डाईज जंक्शन, माजिवडा, ठाणे या एकूण 23.55 किमी रस्त्याच्या दोन्ही मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत (साधारण साडेसहा किलोमीटर) दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने एमएमआरडीए लवकरच टेंडर काढणार आहे. हे काम मार्गी लागताच या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.