MMRDA Tendernama
मुंबई

MMRDAच्या तिजोरीत 3840कोटींचा महसूल; 'त्या' भूखंडांसाठी परदेशी कंपन्यांची विक्रमी बोली

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) तीन भूखंड ८० वर्षांसाठी भाडेपट्टीने देऊन ३,८४० कोटींचा महसूल गोळा केला आहे. या तिन्ही भूखंडांसाठी आतापर्यंतची सर्वाधिक विक्रमी किंमत मिळाली आहे. हे तिन्ही भूखंड परदेशी कंपन्यांनी घेतले आहेत.

एमएमआरडीएने निधी उभारणीसाठी बीकेसीतल्या दहा भूखंडांसाठी टेंडर मागवली होती. मात्र, सहा भूखंडांसाठीच कंपन्यांनी टेंडर दाखल केली. त्यातील तीन भूखंडांचे टेंडर एमएमआरडीएने खुले केले आहे. त्यात दोन भूखंडांसाठी जपानी कंपनी गोयसू प्रा. लि. (सुमिटोमो) विक्रमी बोली लावली आहे. वाणिज्य वापराच्या या भूखंडांसाठी एमएमआरडीएने प्रति चौ. मीटर ३,४४,५०० रुपये राखीव दर निश्चित केला होता. गोयसू कंपनीने एका भूखंडासाठी राखीव दरापेक्षा ४० टक्के अधिक म्हणजेच प्रति चौरस मीटरसाठी ४,८२,९९२ रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक बोली लावून बाजी मारली आहे. त्यातून एमएमआरडीएला १,१७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याच कंपनीने दुसऱ्या भूखंडासाठी ३९.६१ टक्के अधिक दराने म्हणजेच प्रति चौ. मीटरसाठी ४,८०,९४५ रुपयांची बोली लावली आहे.

तिसऱ्या भूखंडासाठी श्लॉस बंगळुरू लिमिटेड आणि अर्लिगा इकोस्पेस बिझनेस पार्क यांच्या संयुक्त भागीदारीत १२.३४ टक्के अधिक म्हणजेच प्रति चौ. मीटर ३,८७,००० रुपयांची बोली लावून बाजी मारली आहे. एमएमआरडीएने या तीन भूखंडांसाठी किमान २,९७३ कोटींचे मूल्य निश्चित केले होते. मात्र, प्राधिकरणाला अपेक्षेपेक्षा ८६६ कोटी रुपयांचा अधिक निधी मिळाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामासाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे. तसेच एमएमआरडीएची यंदाच्या अर्थसंकल्पातील तूट कमी होऊ शकणार आहे.