Ravindra Chavan
Ravindra Chavan Tendernama
मुंबई

मंत्री रविंद्र चव्हाणांचा वेगवान कारभार; जागेवर दिली... (VIDEO)

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीला तात्काळ मंजुरी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी रत्नागिरीतील रखडलेल्या बसस्थानकाच्या बांधकामस्थळाचीही पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली.

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवारपासून दाेन दिवस कोकण दाैऱ्यावर आहेत. आज त्यांनी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन याठिकाणच्या सुविधांची पाहणी केली.

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. त्यात ग्रामीण भागातील रुग्ण माेठ्या प्रमाणात असतात. रुग्णालयातील डाॅक्टर त्यांना चांगली सेवा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु या रुग्णालयाची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. पण हे सगळ खर्चिक असल्याने त्याकडे थाेडेसे दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता पहिल्या टप्प्यात १० काेटी खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याला मंजुरी दिल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. डाॅक्टर, प्रमुख मंडळी यांच्याशी चर्चा करुन तातडीने या सर्व गाेष्टी कशा पूर्ण करता येतील यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू. रुग्णालयातील व्यवस्था सुधारल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियाेजन तसेच सीएसआर निधीतूनही यासाठी काही करता येऊ शकते का, याचीही मी माहिती घेणार आहे. सार्वजनिक आराेग्याच्या सर्व व्यवस्था येणाऱ्या काळात अद्ययावत असल्या पाहिजेत. जेणे करुन गाेरगरीब जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयानंतर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या बांधकामस्थळाची भेट देऊन पाहणी केली. रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय, बसस्थानक आदी ठिकाणच्या सोयीसुविधांचा प्राधान्याने पाठपुरावा करून येथील समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन दिले.