Pratap Sarnaik Tendernama
मुंबई

Pratap Sarnaik : ‘एसटी’च्या सल्लागार संस्थेच्या सल्लागारांवर कारवाईचा दंडुका

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडील कामकाजासाठी सल्लागार म्हणून नियुक्त कंपनीच्या सल्लागारांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फतही स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

या संदर्भात सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सरनाईक यांनी सांगितले, मे. के. पी. एम. जी. या सल्लागार संस्थेच्या सल्लागारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गैरव्यवहाराच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे. सल्लागार संस्थेला तालिकाबद्ध करणाऱ्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला याबाबत  कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एसटी महामंडळामार्फत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मासिक परवाना शुल्क अदा न केलेल्या जाहिरात कंपनीकडून वसुली

एसटी बस स्थानक, बसेसमध्ये आणि बसवरील विविध जाहिरातीसंदर्भात मे. टेकसिद्धी ॲडव्हर्ट प्रायव्हेट लि. या जाहिरात कंपनीने माहे मे २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीचे मासिक परवाना शुल्क विहित वेळेत अदा न केल्याने कंपनीकडून वसुली करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच कंपनीने अपेक्षित जाहिराती न केल्याने महामंडळास कंपनीकडून देय असलेली ९ कोटी ६१ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच कंपनीला देण्यात आलेले डिजिटल जाहिरातीचे अधिकार काढण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. या संदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला. मंत्री सरनाईक यांनी सांगितले, एसटी महामंडळाने ठेकेदारास नोटीस बजावली आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाय योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.