मुंबई (Mumbai) : राज्य शासनाच्या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचे काम नियोजित वेळेत आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावे, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaikumar Raval) यांनी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजीकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा लवकर तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
देशातील विविध महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती यांच्या बैठक आणि निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी मुंबईमध्ये असलेल्या अतिथीगृहांपैकी एक असलेल्या हायमाउंट अतिथीगृहाच्या पुनर्विकासाचे काम पूर्णत्वास आले असून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्याची पाहणी केली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हायमाऊंट येथे महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणार असल्याने या इमारतीचे सुरू असलेले काम मुंबई आणि महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसे असे व दर्जेदाररित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुंबईत येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी असलेले अतिथीगृह हे सर्व सुविधांनी युक्त असावे. त्यादृष्टीने हाय माउंट अतिथीगृहात एक्झिक्यूटिव्ह कक्षांसोबतच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींसाठी आवश्यक सर्व सुविधा असणारे कक्ष असावेत, असेही रावल यांनी सांगितले.
हाय माउंट अतिथीगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असे निर्देशही रावल त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मुंबई विमानतळानजीकच्या नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपसचिव हेमंत डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ चेतन आके, वरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ मि.दी.जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील तावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वि.अ. पाटसकर, डॉ. प्रसन्ना कुलकर्णी उपस्थित होते.