Mhada
Mhada Tendernama
मुंबई

म्हाडा कोकण, पुणे विभागाची बंपर गृह योजना; तब्बल 'इतक्या' हजार...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दिवसेंदिवस घरे महाग होत असल्यामुळे, रिअल इस्टेटचे दर वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्यांना घर विकत घेणे अशक्य होत चालले आहे. म्हाडाच्या सोडतीमुळे सर्वसामान्य माणसांना त्यांचे हक्काचे घर मिळणे सोपे होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष म्हाडाच्या सोडतीकडे लागलेले असते. म्हाडा कोकण विभाग खासगी विकासकांच्या मदतीने पीपीपीमॉडेल अंतर्गत वसईत 75,981 परवडणारी घरे बांधणार आहे. तसेच म्हाडाच्या पुणे विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर येथील 4744 घरांसाठी योजना जाहीर केली आहे.

म्हाडा राज्याच्या विविध भागात सर्वसामान्यांसाठी परवणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देत असते. म्हाडा कोकण विभाग खासगी विकासकांच्या मदतीने पीपीपीमॉडेल अंतर्गत वसईत 75,981 परवडणारी घरे बांधणार आहे. वसईतील 75,981 घरांच्या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी लॉटरी जून 2022 मध्ये काढण्याचे नियोजन सुरु आहे. म्हाडाच्या योजनेनुसार 27,000 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असतील. योजनेतील 17,000 घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असतील. या घरांच्या किंमती 22 लाख 50 हजार रुपयांपासून सुरु होतील. म्हाडाच्या या नव्या प्रकल्पाचे नाव सुरक्षा स्मार्ट सिटी असे आहे.

याशिवाय म्हाडाच्या पुणे विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर येथील 4744 घरांसाठी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे या शहरांमधील हजारो सर्वसामान्यांना त्यांचे स्वत:चे हक्काचे घर मिळणार आहे. या सोडतीची जाहिरात येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल, त्यानंतर इच्छुक नागरिक अर्ज भरू शकतील. म्हाडाच्या पुणे विभागाकडून मागील दोन वर्षातील ही चौथी आणि या वर्षातील पहिली योजना आहे. "जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर, घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदारांना फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळेल," असे म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.

म्हाडाने घोषित केलेल्या 4744 घरांपैकी 2092 घरे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होतील. उर्वरित 2685 घरे इतर सर्व गटांसाठी उपलब्ध असतील. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, पाषाण, खराडी, वाकड, थेरगाव, मुंढवा, वाळमुखवाडी, पुनावळे, मामुर्डी, ताथवडे या भागात सोडतीसाठी सध्या 2092 घरे उपलब्ध आहेत. "20 टक्के योजनेतील घरे खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी विकसित केलेल्या इमारतींमध्ये आहेत. त्यांचे क्षेत्रफळ किंवा आकार 30 ते 60 चौरस मीटर (320 ते 430 चौरस फूट) पर्यंत आहे. हे अगदी लहान गटांसाठी उपलब्ध आहेत, असे माने यांनी सांगितले.