BDD Chawl
BDD Chawl Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' पुनर्विकास प्रकल्पातील नऊ हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पार्किंग

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या टोलेजंग इमारतीत रहिवाशांना पाचशे चौरस फूट सदनिकेसोबत आता प्रत्येकाला स्वतंत्र कार पार्किंग दिले जाणार आहे. नऊ हजारहून अधिक रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पावर तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. सध्या वरळी बीडीडी चाळीच्या जागेवर सहा मजली पोडीयम पार्किंगसह ३९ मजली ३३ इमारती उभारल्या जाणार आहेत. सुरुवातीला चार रहिवाशांमध्ये एक कार पार्किंग दिले जाणार होते. त्यामध्ये सुधारणा करत दोन रहिवाशांना एक पार्किंग देण्यास सरकारने मंजुरी दिली होती. मात्र वरळी बीडीडी चाळीत सुमारे ९ हजार ६८९ रहिवाशी असून त्यांना प्रत्येकाला घर दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास विभागाच्यावतीने प्रत्येक रहिवाशाला पुनर्विकासित इमारतीत स्वतंत्र पार्किंग दिले जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. म्हाडाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सध्या पाहिले सहा मजले पोडियम पार्किंग उभारण्यात येणार होते, तसेच त्यावर ३३ मजली निवासी सदनिका इमारत बांधण्यात येणार होती. मात्र आता सर्व रहिवाशांना पार्किंग देण्यासाठी नव्याने पोडीयम पार्किंगचे दोन मजले उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासावर तब्बल ११,७०० कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. मात्र वाढीव पार्किंगमुळे मंजूर आराखड्यात काहीसा बदल होणार आहे. त्यामुळे प्रकल्प खर्च ४०० कोटी रूपयांनी वाढणार आहे.