मुंबई (Mumbai): मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही.नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भूखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
अंधेरी (पश्चिम) येथील या भूखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. या ठिकाणी ९८ सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटांतील अपार्टमेंट अंतर्गत २४ भूखंड आहेत. याशिवाय वैयक्तिक प्रकारात साठ चौ.मीटर क्षेत्रफळाचे ६२ व १०० चौ. मीटर क्षेत्रफळाचे २४५ भूखंड आहेत.
या ठिकाणच्या इमारतींचा बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव म्हाडाने दिला आहे. एकत्रित- सामूहिक पुनर्विकास केल्यास विविध मुलभूत सुविधा या आधुनिक स्वरुपात उपलब्ध करून देता येणार आहेत. रहिवाशांना प्रशस्त घरे देता येणार आहेत. एकत्रित योजनेमुळे अधिक हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा, व्यावसायिक जागा यांचे टाऊनशिप पद्धतीने नियोजन करता येणार आहे.
खेळाचे मैदान, करमणुकीसाठीचे मैदान, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सभागृह, संस्था कार्यालय यांचा समावेश राहणार आहे. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज इतर सुविधाही आधुनिक स्वरुपात उपलब्ध करून देता येणार आहेत. ग्रीन बिल्डिंग डिझाईन ज्यामध्ये सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, कचरा व्यवस्थापन अशा सुविधांचाही विचार करता येणार आहे.
म्हाडा हा पुनर्विकास वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर, वरळी येथील पुनर्विकास प्रकल्पांच्या धर्तीवर राबविणार आहे. त्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीही स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून या ठिकाणच्या सामूहिक पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.