MHADA
MHADA Tendernama
मुंबई

म्हाडा डिसेंबरमध्ये करणार ४ हजार जणांची 'स्वप्नपूर्ती'; घरे कुठे?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत परवडणाऱ्या दरात स्वत:चे हक्काचे घर घेण्याची संधी चालून आली आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता आहे. या सोडतीमध्ये ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांचा समावेश आहे. या सोडतीची तयारी सध्या जोरावर आहे.

दरम्यान, सिडकोच्या चार हजार घरांसाठी आज सोडत निघणार आहे. सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या सभागृहात पार पडणाऱ्या या सोडतीसाठी 16 हजार अर्ज आले आहेत. नवी मुंबईत खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या घरांना जास्त मागणी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार आदी भागांत सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या आगामी सोडतीमध्ये ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांचा समावेश असणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने 14 ऑक्टोबर 2021 रोजी 8,984 घरांची सोडत काढली होती. तेव्हा, दोन लाख 46 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. म्हाडाच्या नियमांनुसार, विजेत्यांची पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना घरे सुपूर्द केली. त्यापाठोपाठ एका वर्षानंतर कोकण मंडळाने चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अर्जदारांची प्रथम पात्रता निश्चिती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सॉफ्टवेअरही तयार केले आहे. म्हाडाकडून या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून त्यास यश येताच सोडतीचा मार्ग खुला होणार असल्याचे म्हाडातील उच्चपदस्थांनी सांगितले.

कोकण मंडळाकडून जाहीर होणाऱ्या सोडतीमध्ये म्हाडा योजना, पंतप्रधान आवास योजना आणि खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या २० टक्के घरांचा समावेश असणार आहे. म्हाडाला २० टक्के योजनेतून मिळणाऱ्या होणाऱ्या घरांमध्ये १५०० घरांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. मात्र, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम वाढवण्यात येणार आहे. मात्र ही वाढ किती असेल हे अद्यापही जाहीर झालेले नाही. घराच्या एकूण रकमेच्या एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे. मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक परवडणाऱ्या दरांत घर खरेदीसाठी म्हाडाच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात.