Mira-Bhayandar Municipal Corporation Tendernama
मुंबई

मीरा भाईंदर होणार चकाचक;रस्त्यांसाठी ५०० कोटींच्या कर्जाला मान्यता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर शहरात ६७ ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे १ हजार ३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मंंजुरी दिली आहे. बॅंक ऑफ बडोदामार्फत हा कर्ज पुरवठा महापालिकेला होणार आहे.

मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे सुरू आहे. शहरातील रस्ते उत्तम आणि दीर्घकाळ टिकावेत यासाठी शहरातील रस्ते सिमेंटचे बनविण्याचा निर्धार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी शहराच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून ६७ ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे १ हजार ३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र एवढा मोठा खर्च महापालिकेला करता येणे शक्य नसल्याने खासगी बॅंकेतून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नियमानुसार महापालिका प्रशासनाला खासगी कर्ज घेण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यामुळे हे कर्ज घेण्याची परवानगी मिळावी म्हणून महापालिकेने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम टप्प्यात केवळ पाचशे कोटींचे कर्ज घेण्याचे परवानगी महापालिकेला दिली आहे. बॅंक ऑफ बडोदामधून हे कर्ज महापालिकेला मिळणार आहे. कर्जाचा परतावा १० ते ६० वर्षे या कालावधीत करायचा आहे. कमीत कमी व्याजदरात हे कर्ज मिळावे यासाठी महापालिकेकडून बॅंकेबरोबर वाटाघाटी सुरू आहेत. औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे ५०० कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेला मिळणार आहे.