mahalakshmi railway station
mahalakshmi railway station Tendernama
मुंबई

महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरातील कोंडी फूटणार; आता 120 कोटीतून..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा पूर्व आणि पश्चिम दिशेने विस्तार होणार आहे. या विस्तारित पुलाच्या बांधकामावर मुंबई महापालिका सुमारे 120 कोटींचा खर्च करणार आहे. हे काम पावसाळा वगळून 30 महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. यामुळे महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसर आणि संत गाडगे महाराज चौक परिसर (सात रस्ता चौक) वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील केबल स्टेड रेल्वेवरील पुलाचा विस्तार एन. एम. जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रिज जंक्शन म्हणजेच गंगाराम तळेकर चौकापर्यंत केला जाणार आहे. तर हाजी अली जंक्शनजवळील महालक्ष्मी रेसकोर्स वाहनतळामधून एका मार्गिकेचे बांधकामही या केबल स्टेड पुलाला जोडले जाणार आहे. यापूर्वीच्या केबल स्टेड पुलाच्या बांधकामावर सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महालक्ष्मी रेल्वे स्थानकालगतच्या परिसरातील आणि संत गाडगे महाराज चौक परिसरातील (सात रस्ता चौक) या भागातील वाहतूक कोंडी सुटावी याकरिता रेसकोर्स जवळील केशवराव खाड्ये मार्गापासून संत गाडगे महाराज चौकापर्यंत एक नवीन पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. ई. मोझेस रोड आणि केशवराव खाड्ये मार्ग यावर रेल्वे मार्गावर पूल असून, सात रस्ते असलेल्या संत गाडगे महाराज चौकात हे पूल उतरतात. महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल हा ताडदेव, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि वरळी व लोअर परळ विभागाला जोडला जातो. कोस्टल रोड झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत करण्याकरिता डॉ. ई. मोझेस मार्ग आणि केशवराव खाड्ये मार्गावर रेल्वे लाईनवर पूल बांधणे गरजेचे असल्याचे तांत्रिक सल्लागार 'स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' आणि फेरतपासणीसाठी नेमलेल्या सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार टेंडर मागवण्यात आले होते.

हे पूल दक्षिण बाजूला केबल स्टेडचा वापर करत बांधण्यात येत असून ते पूर्णपणे न पाडता या नवीन दोन पुलांची बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच दोन्ही पुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम हाती घेतले जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या केबल स्टेड पुलाच्या प्रत्येकी दोन मार्गिका शिरीन टॉकीजच्या अगोदर संपवून नवीन प्रस्तावित पुलाच्या प्रत्येकी दोन मार्गिका या जेकब सर्कल (सात रस्ता) मलनिस्सारण प्रचालन केंद्रावरून रेल्वेवरील पुलाचा विस्तार गंगाराम तळेकर चौक अर्थात एन. एम. जोशी मार्ग व एस ब्रिज जंक्शनपर्यंत केल्यास सात रस्ता जंक्शनला होणारी वाहतूककोंडी कमी होईल.

शिवाय केशवराव खाड्ये मार्गावरील महालक्ष्मी रेसकोर्सजवळील 70 झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी एक मार्गिका वर चढवून सध्या सुरू असलेल्या रेल्वेवरील केबल स्टेड पुलाला जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या विस्तारित पुलाचे काम पावसाळा वगळून 30 महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे.