Missing
Missing  
मुंबई

गुड न्यूज! मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होणार; या बोगद्याचे 80 टक्के..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई-पुणे या शहरांतील अंतर कमी करणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या पर्यायी रस्तावर तयार करण्यात येत असलेल्या एका बोगद्याचे काम जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले. हा बोगदा एकूण नऊ किलोमीटर लांबीचा असून, त्यापैकी आतापर्यंत सात किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागातील पर्यायी रस्तावर दोन बोगदे व दोन व्हायाडक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाने गती घेतली आहे. या बोगद्याची रुंदी २३.५ मीटर इतकी आहे. या मीसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, यामुळे प्रवाशांचा २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या प्रकल्पामुळे बोर घाटातील ६ किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. २०१९ मध्ये या कामास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी कोरोनामुळे हे काम थांबले होते. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने या कामाने गती घेतली आहे.

पावसाळ्यात एक लेन बंद
या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या ‍पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या राहिलेल्या ‘मीसिंग लिंक’मुळे मुंबईला लवकर पोचणे शक्‍य होणार आहे.