BMC
BMC Tendernama
मुंबई

मुंबई महापालिका निवडणूक: अर्ध्या तासात पाच हजार कोटींचा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिकेच्या सोमवारच्या शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल 250 प्रस्ताव मंजूर झाले. या प्रस्तावांच्या माध्यमातून तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा निर्णय अवघ्या 30 मिनिंटामध्ये घेण्यात आले. यातील अनेक प्रस्ताव नियामानुसार मांडण्यात आले नसल्याचा दावा करत भाजपने या बैठकीला विरोध केला. मात्र, शेवटच्या दिवसाचे कामकाजही गाेंधळताच पार पडले. प्रत्येक मिनिटाला साधारण 166 कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाले.

महापालिकेची मुदत संपल्यामुळे मंगळवारपासून सर्व कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे. तर, कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल तीन हजार कोटींहून अधिक रक्कमेचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. तर, पूर्वीचे राखीव प्रस्ताव मिळून तब्बल सहा हजार कोटींच्या कामांचा निर्णय होणार होता. असे सुमारे 350 च्या आसपास प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर होते. त्यातील 250 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 100 प्रस्ताव राखून ठेवण्यात आले.

स्थायी समितीचे प्रस्ताव तीन दिवसांपूर्वी सदस्यांना मिळणे आवश्‍यक होते. मात्र, अनेक प्रस्ताव विलंबाने मिळाल्याचा आक्षेप घेत या कामकाजावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मागितली. मात्र, त्यांनी ही परवानगी नाकारत कामकाज सुरु केले. त्यावर भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. प्रस्तावांचे तुकडे करत तेही अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. भाजपच्या या घोषणाबाजीला शिवसेनेच्या सदस्यांनीही घाेषणांनी उत्तर देण्यास सुरवात केली. त्यामुळे शेवटच्या बैठकीतही गोधळ सुरु होता. या गोंधळातच बैठकीचे कामकाज पूर्ण केले. बैठक संपल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या दालनाबाहेरही ठिय्या आंदोलन केले.

महापालिका आयुक्तांनी जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. नियमानुसार स्थायी समितीचे कामकाज झाले नाही. हे पैसे कष्टकरांचे आहेत. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी नियम न पाळता सर्व प्रस्ताव मंजूर केले. त्यासाठी आयुक्तांनी मुंबईकरांना न्याय देण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
- प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते

स्थायी समितीत नागरिकांच्या गरजेचे आणि मुंबईच्या विकासाचे निर्णय घेतले जातात. नियमानुसार काम झाले आहे. चार वर्षांच्या काळात सर्व पक्षीय सदस्यांनी सहकार्य केले. भाजपला आता भ्रष्टाचार दिसत असला तरी 25 वर्षे ते आमच्या सोबत होते. आता फक्त नैराश्‍यातून हे आरोप केले जात आहेत.
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष