Mumbai Metro-3
Mumbai Metro-3 Tendernama
मुंबई

फडणवीसांनी अखेर करून दाखविले; मेट्रो-३ची पहिली गाडी धावली...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आरे कारशेडच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-३ची (Mumbai Metro-3) ट्रायल रन अखेर मंगळवारी आरेतील सारिपूतनगर येथे पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो-३ च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाअंतर्गत प्रथमच भुयारी मार्गावरून ही मेट्रो धावली. सारिपूतनगर ते मरोळ अशा तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.
राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसांत तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे त्यांनी सांगितले. हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो ३ ची वैशिष्टे सांगून डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

- मुंबई मेट्रो लाईन ३ची ठळक वैशिष्ट्ये...

- मुंबई मेट्रो लाईन -३ च्या ट्रेन्स ८ डब्यांच्या असतील. ७५% मोटरायझेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.

- रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.

- एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

- ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

- स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.

- ट्रेन प्रचालन साठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड

- ट्रेन कंट्रोल (CBTC) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदची वारंवारता ठेवणे शक्य होणार आहे.

- प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.

- स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.

- ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.

- डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्तिथीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

- रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून 'मुंबई मेट्रो लाइन -३' या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.

- सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.

- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली होती, पण आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरून वाद निर्माण झाला. कारशेडसाठी आरेमधली झाडे तोडण्याला शिवसेना, काही पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला ब्रेक लागला. तसेच कारशेडसाठी कांजूरमार्गमधल्या पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी जोर धरू लागली. कांजूरमार्गची जागा खासगी व्यक्तीची आहे का? यावरूनही वाद होता. अखेर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले.

- शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरित मंजुरी दिली. शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले.