Central Park New York Tendernama
मुंबई

महालक्ष्‍मी रेसकोर्सच्या 300 एकर जागेवर उभा राहतोय Mumbai Central Park

Mumbai: DPR तयार, लवकरच कामाला होणार सुरवात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्‍मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर 'मुंबई सेंट्रल पार्क'चे काम लवकरच सुरू होईल. जागतिक दर्जाच्‍या सेंट्रल पार्कचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) तयार झाला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

'स्वच्छता ही सेवा २०२५' या अभियानांतर्गत 'स्‍वच्‍छोत्‍सव' उपक्रम राबविण्‍यात येत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून उपमुख्‍यमंत्री शिंदे यांच्या हस्‍ते आणि कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्‍यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूत, वास्‍तवातील 'हिरो' आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्‍ह) सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही सुद्धा शिंदे यांनी दिली.

स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्‍याचे अनुकरण राज्‍यातील इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्‍ते, पदपथ स्‍वच्‍छ करत पाण्‍याने धुवून काढण्‍यात आले. यावेळी स्‍वच्‍छतेविषयक सामूहिक शपथ घेण्‍यात आली.

उपमुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, संपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठी' अभियान सुरू आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरू ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घेतल्‍यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली. पिण्‍याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महाराष्‍ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

नगरविकास विभागाने घनकचरा टाकण्‍यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधून काढली आहेत. त्‍यांच्‍या स्‍वच्‍छतेचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे. राज्यभर स्‍वच्‍छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्‍वच्‍छता मित्रांसाठी आरोग्‍य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सवदेखील घेण्‍यात येणार आहे.

यासमवेतच प्रभात फेरी, स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचे लोकार्पण, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, सर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेत, असे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेत, त्‍या ठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्‍याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्‍तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबविल्‍या जात आहेत. स्वच्‍छता कर्मचारी आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी महानगरपालिका आरोग्‍य शिबिरे घेत आहे, हे निश्चितच कौतुकास्‍पद आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 'डीप क्लीन ड्राईव्ह' अभियान राबविले. अभियानाच्या माध्यमातून मोठे काम झाले. त्याचा मोठा परिणाम झाला. अशाच प्रकारचे स्‍वच्‍छता अभियान पुन्‍हा राबवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

ते म्‍हणाले, स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने एक लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. नागरी वने, उद्यानांची देखभाल केली जात आहे. 'हरित क्षेत्र' वाढवण्‍यावर भर दिला जात आहे. महालक्ष्‍मी रेसकोर्सची जागा उद्यानासाठी घेण्‍यात आली आहे. मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्‍मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर 'मुंबई सेंट्रल पार्क' चे काम लवकरच सुरू होईल.

जागतिक दर्जाच्‍या सेंट्रल पार्कचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांसाठी रस्ते काँक्रिटीकरण करण्‍यात येत आहे. पुढील दीड - दोन वर्षात मुंबईतील संपूर्ण रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगरपालिका उपायुक्त, सहायक आयुक्‍त, अधिकारी, कर्मचारी, कामगार शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रतिनिधी, नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.