workers Tendernama
मुंबई

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राबणाऱ्या हातांची दिवाळी 'गोड'!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईला ‘स्मार्ट’ अन् गतिमान करणाऱ्या हातांची दिवाळी यावर्षी गोड आणि प्रकाशमय झाली. निमित्त होते मेट्रो, मोनोरेल, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीत दिवस-रात्र श्रम करणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या नवी मुंबईतील आरबीजी फाउंडेशनने राबवलेल्या उपक्रमाचे!

या फाउंडेशनच्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांनी ‘प्रकाशभेट’ या उपक्रमातून मुंबईच्या विकासात योगदान देणाऱ्या शंभरहून अधिक कामगारांच्या कुटुंबांना साडी, ड्रेस आणि मिठाई भेट देऊन त्यांच्या घरी दिवाळीचा गोडवा पोचवला.

शहराचा विकास काँक्रिट, विटा, रेती आणि सिमेंटवर उभा असला तरी त्यामध्ये हजारो श्रमिकांचा घाम मिसळलेला आहे. हे कामगार आपल्या मूळ गावीपासून शेकडो मैल दूर येऊन प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतात. पदराआड लेकराला झोपवून काम करणाऱ्या महिलांपासून ते दिवसभर धुळीत खेळणाऱ्या लहानग्यांच्या आयुष्यात दिवाळीचा उजेड आणण्याची जबाबदारी आपली मानून ‘आरबीजी फाउंडेशन’ने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

आपण मुंबईत राहतो, पण तिच्या उभारणीत झटणारे हात दुर्लक्षित राहू नयेत, त्यांच्या छोट्या घरातही दिवाळीचा गोडवा पोहचावा यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबईच्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांनी व्यक्त केली.

आरबीजी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार, विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रात कार्य केले जाते. राज्यातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी फाउंडेशतर्फे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करण्यावर संस्था भर देते असे त्यांनी स्पष्ट केले.