Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Tendernama
मुंबई

Deepak Kesarkar: दिल्लीच्या धर्तीवर आता मुंबईतही भूमिगत 'पालिका बाजार' संकल्पना यशस्वी होणार का?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतील जागेची कमतरता लक्षात घेता मैदानाखालील भागात भूमिगत 'पालिका बाजारा'ची (Palika Bazar) संकल्पना राबविण्याचा विचार आहे. त्याबाबत तज्ज्ञांची मते घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात पार पडलेल्या वार्तालाप प्रसंगी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली. यावेळी, शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे व काही माजी नगरसेवक हे उपस्थित होते.

मुंबईत जागेची कमतरता आहे. त्यातच फेरीवाले व दुकानदार यांचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे मुंबईत जागेची कमतरता दूर करण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर 'पालिका बाजार' ही संकल्पना राबवायला पाहिजे. दिल्लीत ही संकल्पना 50 वर्षापूर्वीपासून राबविण्यात आली असून, ती यशस्वी ठरली आहे. मुंबईतही मैदानांच्या ठिकाणी भूमिगत स्वरूपाची 'अपना बाजार' संकल्पना राबवायचा विचार आहे. मात्र त्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

मुंबईतील समुद्र किनारे, चौपट्या या ठिकाणी मुंबईकर व पर्यटक भेटी देतात. त्यामुळे समुद्र किनारे, चौपाट्या स्वच्छ ठेवण्यावर अधिकाधिक जोर देण्यात येणार आहे. त्यासाठीच येत्या सोमवारपासून आपण स्वतः माहिम व दादर चौपाटी या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेबाबतच्या कामांची पाहणी करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.