मुंबई (Mumbai): वसई - विरार परिसराचा झपाट्याने विकास होत असून, या भागाकरिता रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर महापालिकेकडे हस्तांतरण करावे. महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या सर्व कामांचा निर्धारित कालावधीतील कार्यक्रम आखून सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आगामी एक महिन्याच्या कालावधीत महापालिका आणि गृह विभागाने कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वसई विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वसई-विरार महापालिकेने पायाभूत सुविधांची कामे करताना एक कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून आरोग्य, रस्ते, पुलांची प्रलंबित कामे, परिवहन, गृहनिर्माण प्रकल्प यासह सर्व विभागातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विहित कालावधीत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. महापालिका क्षेत्रातील ज्या रस्त्यांसाठी जागा उपलब्ध आहे अशा रस्त्यांसाठी नगरविकास विभागाने निधी वितरीत करावा ही कामे पूर्ण होण्यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने महापालिकेकडे वर्ग करावीत. महापालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करावेत, असे फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महापालिका क्षेत्रात पार्किंगची खूप मोठी समस्या आहे यासाठी परिवहन विभागाने पार्किंग झोन सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे निर्माण करण्याची कार्यवाही गतीने करावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग झोन होणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रात होणाऱ्या इमारतींचे बांधकाम तसेच विविध परवानग्या देताना महापालिकेने कायदेशीर बाबी तपासून घेणे आवश्यक आहे. महापालिका क्षेत्रातील बांधकामांसाठी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी.
आचोळे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे कामही गतीने करावे. मालमत्ता व कर वसुलीसाठी अभय योजना राबवावी यामध्ये महापालिकेशी संबधित बाबींचा समावेश करून घ्यावा. महापालिकेत नियमित असलेल्या पदावरचे अधिकारी यांच्याकडेच पदभार देण्यात यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अनिल पवार, पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मीरा-भाईंदर, वसई, विरारचे पोलीस उपायुक्त निकेत कौशिक यावेळी उपस्थित होते.