मुंबई (Mumbai) : प्रवासी सुरक्षिततेसाठी उपनगरी रेल्वेला (लोकल) बंद होणारे दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर वातानुकूलित (एसी) रेल्वे वाढविण्यात येणार आहेत. त्याची भाडेवाढ न करण्यावर देखील विचार सुरू आहे. काल जे घडले त्यातून निश्चितच बोध घ्यावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार मिळून याबाबत योजना आखेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूतीनिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दीर्घ चर्चा केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘‘मेट्रो चांगल्या दर्जाच्या आहेत. ‘लोकल’मध्ये प्रवास करणारा नागरिक दुय्यम नाही. त्यालाही मेट्रो, ‘एसी’ गाड्यांप्रमाणेच सुविधा मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. वैष्णव यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तिकिट दर न वाढवता ‘एसी लोकल’चा प्रवास होईल, यावर विचार सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.
मेट्रोचे नेटवर्क पूर्ण न झाल्याने ‘लोकल’मध्ये गर्दी आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी दरवाजे लावण्याचा विचार करण्यात येत आहे. कोणी म्हणाले, दरवाजे लावले तर लोक गुदमरतील. गुदमरू नये अशी रचना करावी एवढे तर सरकारला कळते ना, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.