Railway
Railway Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' मार्गावरील रेल्वे ट्रॅकची तब्बल एक तप रखडपट्टी; खर्चातही 350 कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या-सहाव्या ट्रॅकच्या खर्चात तब्बल ३५० कोटींची वाढ झाली आहे. २०१० पासून प्रस्तावित असलेल्या या ट्रॅकमध्ये रहिवाशी इमारती येत असल्याने प्रकल्पाची रखडपट्टी झाली आहे.

सीएसएमटी-कुर्ला दरम्यान सध्या चार ट्रॅक असून त्यापैकी एक आणि दोनवरून धिम्या गाड्या चालवल्या जातात. तर तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकवरुन जलद लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. कुर्ल्याच्या पुढे कल्याणपर्यंत पाचवा-सहावा ट्रॅक आहे. मात्र सीएसएमटी कुर्ला दरम्यान नसल्याने जलद लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या चालवण्यास मर्यादा येतात. त्यापार्श्वभूमीवर २०१० मध्ये एमआरव्हीसीच्या माध्यमातून एमयूटीपी-2 अंतर्गत सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा ट्रॅक टाकण्यासाठी आराखडा तयार केला होता. तेव्हा प्रकल्पाचा खर्च ५३७ कोटी होता. त्यामध्ये आता मोठी वाढ झाली आहे. हा खर्च आता ८९० कोटींवर गेला आहे.

मुंबई रेल विकास कार्पेरेशनने (एमआरव्हीसी) एमयूटीपी-२ अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. सध्या एमयूटीपी-३ ची मुंबईत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र एमयूटीपी-२ मध्ये असलेल्या पाचव्या-सहाव्या ट्रॅकचे अद्याप काम सुरू झालेले नाही. पाचव्या-सहाव्या ट्रॅकमध्ये अनेक रहिवाशी इमारती येतात. त्याबाबत सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे प्रकल्प लटकला आहे. या इमारतींना धक्का न लावता सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वेच्याच जागेत उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग बनवण्याचा एकमेव पर्याय आहे. मात्र त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याची माहिती रेल्वेतील उच्चपदस्थांनी दिली.