Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

ठाणे महापालिकेचा नुकसानीचा व्यवहार; टेंडरमध्ये ६.७५ कोटींचे नुकसान

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) दिलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील विद्युत खांबांवर जाहिरातीच्या टेंडरमधील नुकसानीचा व्यवहार समोर आला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत १० कोटी ३५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात ठेकेदाराने केवळ ३ कोटी ३९ लाख महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे उत्पन्नात तब्बल ६ कोटी ७६ लाख रुपयांची घट झाली झाली आहे. विशेष म्हणजे, टेंडरची मुदत संपून वर्ष उलटत आले तरी ठेकेदाराची जाहिरातबाजी जोरात सुरु आहे.

शौचालयांवरील जाहिरातबाजीत झालेल्या घोटाळ्याचा मुद्दा ताजा असतानाच ठाणे महापालिकेच्या विद्युत खांबांवरील जाहिरातींमधूनही महापालिकेची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने ८ डिसेंबर २०१७ रोजी संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिला होता. त्यानुसार ३,०८५ खांबांवर जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापोटी महापालिकेला तीन वर्षांत १०.३५ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत येणे अपेक्षित होते. तशा आशयाचा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी दोन कोटी ५२ लाख, दुसऱ्या वर्षी तीन कोटी सहा लाख, तर तिसऱ्या वर्षी चार कोटी ७७ लाख असे १० कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणे अपेक्षित होते.

ठेकेदाराने मात्र प्रत्यक्षात महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत केवळ २,५२१ विद्युत खांबांवर जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्यातून पालिकेला तीन वर्षांत केवळ ३.५९ कोटी दिले असून उर्वरित ६.७६ कोटी रुपये दिलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेची फसवणूक झाली आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदाराकडून एक कोटी २६ लाखांची बँक गॅरंटी घेतली होती. मात्र त्याची मुदतदेखील जुलै २०२१ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यामुळे यातूनही पालिकेचे नुकसानच झाले आहे. संबंधित ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने तीन हजार ८५१ विद्युत खांबांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. आधीच्या टेंडरमध्ये ३,०८५ खांब होते, त्यात आता वाढ दाखविण्यात आली आहे. तसेच यापोटी पालिकेच्या तिजोरीत वार्षिक अडीच कोटी मिळणार आहेत. मात्र, आता हा ठेकाही आधीच्याच ठेकेदाराला देण्यासाठी महापालिका स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते. चंद्रहास तावडे यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे.