Kalyan-Dombivali Municipal Corporation
Kalyan-Dombivali Municipal Corporation Tendernama
मुंबई

KDMC : रस्ता सुधारण्याचे 16 कोटी खड्ड्यात; ठेकेदारांवर काय कारवाई करणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येणारे १६ कोटी रुपये कुठे गेले असा सवाल केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी खड्डे भरण्यासाठी दिलेली डेडलाईन ठेकेदारांनी पाळलेली नाही. त्यामुळे या ठेकेदारांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार असा प्रश्न केला जात आहे.

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यात महापालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. या प्रकरणी अनेकांनी आवाज उठविला आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १६ कोटी रुपये खर्चाची टेंडर काढली आहेत. या टेंडर प्रक्रियेनुसार महापालिका हद्दीतील १० प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत १३ कंत्राटदारांना खड्डे बुजविण्याचे काम विभागून दिले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याची पोलखोल शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी केली होती. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रशासनाला जाब विचारत रस्ते बुजविण्याच्या कामात टक्केवारी घेतली जाते. त्यामुळे कामे चांगल्या दर्जाची केली जात नाहीत, अशी टीका केली आहे.

यानंतर महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे स्वत: रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी कामाची पाहणी केली होती. या पाहणी पश्चात त्यांनी १३ सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील असा दावा केला होता. या दाव्यानुसार त्यांनी दिलेली मुदत उलटून गेली तरी कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मोहन उगले यांनी देखील प्रशासनाला लक्ष करुन रस्ते बुजविण्याच्या कामावर केला जाणारा खर्च खड्ड्यात जाणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गणरायांचे आगमन रस्तेमय खड्ड्यातून झाले असल्याने उगले यानी प्रशासनाच्या या दिरंगाई विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.