Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : थीम पार्कच्या नावाखाली रेसकोर्सची 135 एकर जमीन ओरबाडण्याचे षडयंत्र?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रेसकोर्सच्या जागेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने मान्य केला असला, तरी कॉंग्रेसने या विभाजनाला विरोध केला आहे. क्लब सोबतचा भाडेकरार दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आला असताना रेसकोर्सचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार या क्लबच्या कमिटीला कोणी दिला, असा संतप्त सवाल मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला असून या प्रक्रियेला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. रेसकोर्सच्या २२६ एकरपैकी १३५ एकरचा भूखंड विकसित करून तेथे थीम पार्क उभारण्याची संकल्पना महापालिकेने समोर आणली आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती असलेली रेसकोर्सची जागा ही मुंबईकरांच्या मालकीची असून या जागेचा निर्णय लोकांच्या मतानेच व्हायला हवा. सरकारच्या दबावाला बळी पडून रॉयल टर्फ क्लब हा निर्णय घेऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका गायकवाड यांनी मांडली. मुंबईकरांनीही महापालिकेतर्फे सुरू असलेल्या या प्रचंड लुटीला विरोध करायला हवा. रेसकोर्सची जागा वाचविण्यासाठी आता मुंबईकरांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. रेसकोर्सच्या जागी थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतील प्रशासकांनी मांडल्यानंतर विविध स्तरांवरून त्याचा विरोध सुरू झाला आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला हा २२६ एकरचा भूखंड भाडेतत्त्वावर दिला होता. या भाडेतत्त्वाच्या कराराची मुदत २०१३ ला संपली आहे. असे असतानाही रॉयल टर्फ क्लबने रेसकोर्सच्या विभाजनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे रेसकोर्सच्या २२६ एकरपैकी १३५ एकरचा भूखंड विकसित करून तेथे थीम पार्क उभारण्याची संकल्पना महापालिकेने समोर आणली आहे. मात्र ही जागा सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित ठेवावी ही मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच रेसकोर्सची जागा मुंबईकरांची असून त्यावर बांधकामाची एक वीटही रचू देणार नसल्याचा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला.

रेसकोर्सच्या या भूखंडाबाबत परस्पर निर्णय घेण्याच्या महापालिकेच्या कारभाराला विरोध करून त्या म्हणाल्या की लोकप्रतिनिधी उपलब्ध नसताना अशा प्रकारचा निर्णय घेणे हे मुंबईकरांची फसवणूक आहे. रॉयल टर्फ क्लब कडून झालेल्या गैरप्रकारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुळात १० वर्षांपूर्वी भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर आता या क्लबची कमिटी रेसकोर्सच्या जागेच्या विभाजनाचा प्रस्ताव कसा मंजूर करते सरकारच्या दबावाला बळी पडून हा निर्णय झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रेसकोर्सच्या जागेवर कोणतेही बांधकाम करण्याला काँग्रेसचा विरोध असेल. ही जागा मोकळीच राहायला हवी आणि त्यावर सर्व मुंबईकरांचा अधिकार हवा. सरकारने थीम पार्कऐवजी त्या ठिकाणी सार्वजनिक उद्यान उभारायला हवे अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

रेसकोर्सचे भवितव्य क्लब ठरवू शकत नाही - मकरंद नार्वेकर
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब च्या 1718 सदस्यांपैकी केवळ 540 सदस्यांनी योजनेच्या बाजूने मतदान केले आहे. याचा अर्थ शहरातील नागरिक त्यास अनुकूल आहेत असा होत नाही आणि रेसकोर्स हे सर्व मुंबईकरांसाठी आहे त्याबाबतचा निर्णय क्लब घेवू शकत नाहीत असे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्रारे कळविले आहे. महापालिकेने मुंबईकरांच्या मनातील याबाबतच्या चिंता दूर करायला पाहिजेत. या आराखड्याबाबत नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे, महापालिकेने रेसकोर्सचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवला पाहिजे, याबाबत उच्चाधिकारी समिती नेमावी अशी मागणीही नार्वेकर यांनी केली आहे.