Coastal Road
Coastal Road Tendernama
मुंबई

'या' कारणांमुळे कोस्टल रोडला होणार सहा महिने विलंब

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईमधील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कोस्टल रोड (Coastal Road) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कामही जोरात सुरु आहे. मात्र दोन पिलरमधील अंतर वाढवण्याच्या निर्णयामुळे कोस्टल रोडच्या कामाला अतिरिक्त सहा महिने लागणार असल्याने हे काम आता पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. महापालिकेने कोस्टल रोडच्या पिलर क्रमांक ७ आणि ९ मधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोन पिलरमधील अंतर वाढल्याने वेगळे तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. कंत्राटदाराला यासाठी परदेशी तज्ज्ञांशी चर्चा करावी लागत आहे.

मुंबईतील वाढणारी लोकसंख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची पार्किंग तसेच रोज शेकडो नवीन वाहनांची पडणारी भर यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर कोस्टल रोडचे काम वेगाने सुरु आहे. कोरोना काळात काही प्रमाणात काम धीम्या गतीने सुरु होते. कोरोना आटोक्यात आल्याने प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड पालिकेकडुन बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरीत क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणस्नेही ठरणार आहे.

वरळी येथील 'क्लिव्हलँड जेट्टी'मधून मच्छिमारांच्‍या बोटींना ये-जा करण्‍यासाठी समुद्रातील किनारी रस्‍ता प्रकल्‍पामधील पुलाच्‍या दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी २०० मीटर ठेवण्‍याची मागणी स्‍थानिक मच्छिमारांकडून करण्‍यात आली होती. राष्‍ट्रीय समुद्र विज्ञान संस्‍था यांनी किनारी रस्‍ता प्रकल्‍पासाठी जुलै २०१७ मध्‍ये अभ्यास अहवाल तयार केला. "समुद्र लाटा, कमाल पाण्याची पातळी, वादळी लाटा, त्सुनामीच्या लाटांची उंची आणि समुद्रतळाशी होणारे बदल" याबाबत केलेल्या अभ्यासातून अहवाल आहे. यात डॉ. सुरेंद्र सी. ठाकूर देसाई यांनी वादळी लाटा विचारात घेऊन बोटींच्‍या सुरक्षित वाहतुकीसाठी दोन पिलर मधील कमीत कमी अंतर १६० मीटर असण्‍याची आवश्‍यकता आहे, असे नमूद केले आहे. महापालिकेने कोस्टल रोडच्या पिलर क्रमांक ७ आणि ९ मधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. कोस्टल रोडवर ३.५ मीटर व्यासाचे मोनोपायलिंग केले जात होते. आत दोन पिलरमधील अंतर वाढल्याने वेगळे तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. कंत्राटदाराला यासाठी परदेशी तज्ज्ञांशी चर्चा करावी लागत आहे. यामुळे कोस्टल रोडच्या कामाला उशीर होणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामामुळे मच्छीमारीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. प्रकल्पाच्या कामामुळे रोजगार बुडत असल्याने सुमारे १ हजार मच्छीमारांनी महापालिकेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीबाबत पालिकेने नुकसानाची चाचपणी करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची (TISS) ची नेमणूक केली होती. टाटा संस्था, मुंबई महापालिका आणि मच्छीमार संघटना यांच्यामध्ये नुकसान भरपाईची चाचपणी करण्यासाठी दोन बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यावर सहमत झाले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून ते प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीतील नुकसान भरपाई या मच्छीमारांना दिली जाणार आहे. बोटीतून हाताने जाळे टाकून मासेमारी करणाऱ्या अशा मच्छीमारांचा यामध्ये समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नियमितपणे बोटी सुरू झाल्यानंतर ही आर्थिक नुकसान भरपाई देणे बंद केले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.