Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे काम युद्धपातळीवर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरणाऱ्या (22 कि.मी. लांबी) शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

मुंबई पारबंदर प्रकल्पातील २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सेतूवरून आता मालवाहतूक करणारी वाहने, बांधकाम साहित्याची ने-आण करणे शक्य होणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या पॅकेजचा शेवटचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. हा स्पॅन १३६ मीटर लांब असून १३७६ मॅट्रिक टन वजनाचा आहे. पॅकेज २ मध्ये ६५ मी ते १८० मी चे ३२ स्पॅन उभारण्यात येणार होते, ज्यांची उभारणी आता पूर्ण झाली आहे. तर प्रकल्पातील अन्य दोन टप्प्यांची कामेही ९३ टक्के पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने मुंबई- शिवडी-चिर्ले भाग जोडला गेला आहे. त्यानंतर आता या पुलावरून मालवाहू वाहने आणि बांधकाम साहित्याच्या गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात येईल. यापूर्वी हे साहित्य सेतुला समांतर पूल उभारून तसेच बोटींच्या मदतीने ने-आण केली जात होती. या वाहतुकीमुळे आता उर्वरित टप्प्यातील कामे वेगाने पूर्ण होतील.

देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरणाऱ्या (22 कि.मी. लांबी) शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग सहा पदरी असून 16.5 कि.मी. समुद्रावरून तर 5.5 कि.मी.मार्ग जमिनीवरील पिलरवरून जाणार आहे. या मार्गाला मध्य मुंबईत शिवडी येथे शिवाजीनगर येथे आणि नॅशनल हायवे क्र. 4 बी येथे चिर्ले येथे इंटरचेंज असणार आहे. सध्या वाहनाने दक्षिण मुंबईतून न्हावा शेवा येथे पोहचण्यास दीड ते दोन तास लागतात. हा मार्ग पूर्ण झाल्यास अवघ्या 20 मिनिटांत हे अंतर कापणे शक्य होणार आहे. तसेच शिवडी ते वरळी सागरी सेतू असा कनेक्टर बांधण्याचे काम सुरू असल्याने वांद्रे ते थेट शिवडी ते न्हावा शेवामार्गे मुंबई ते पुणे एक्प्रेसवे गाठता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मार्गाची पाहणी करणार आहेत. पॅकेज १ शिवडी येथून या आढावा दौऱ्याची सुरुवात होईल अशी माहिती एमएमआरडीएने दिली. तत्पूर्वी, रविवारी केंद्रीय पथकाने या प्रकल्पाची आणि सागरी सेतुची पाहणी केली.