Thane
Thane Tendernama
मुंबई

ठाण्यापाठोपाठ 'या' शहरातही 'सॅटीस'ची अंमलबजावणी; ८१ कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वाहतुकीची कोंडी फोडण्यास उपयुक्त 'सॅटीस' प्रकल्पाची अंमलबजावणी आता ठाणे शहरापाठोपाठ अंबरनाथमध्येही होणार आहे. नुकतीच त्यासाठी ८१ कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. अंबरनाथ शहराच्या स्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडून येथील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सॅटीस प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. पूर्व भागात असलेल्या वाहनतळाचाही समावेश या प्रकल्पात करण्याला काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती.

अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती अशा स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील य.मा. चव्हाण खुले नाट्यगृह कला आणि नाट्य चळवळीचे केंद्र होते. बहुउद्देशीय वापराचे वाहनतळ उभारण्यासाठी काही वर्षांपूर्वी नाट्यगृह जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले. मात्र उभारणीपासूनच हे वाहनतळ वादाच्या भोवऱ्यात सापडले. यातील भूमिगत मजला आणि तळमजल्यावर सध्या वाहनतळ सुरू आहे. मात्र अजूनही ही वास्तू अपूर्ण असून ती भकास वास्तूप्रमाणे दिसते. त्यातच स्थानकाशेजारील या चौक परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला याठिकाणी सॅटीसची चाचपणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

गेल्या महिन्यात स्थानकाशेजारील वादग्रस्त वाहनतळाची वास्तू सॅटीस प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्याआधी पालिकेने या वाहनतळाच्या वास्तूचे संरचनात्मक लेखापरिक्षण केले होते. ही वास्तू सॅटीसमध्ये समाविष्ट करण्यासाठी योग्य असल्याचा निर्वाळा मिळाला होता. या वास्तूचा सॅटीसमध्ये समावेश केल्याने या प्रकल्पाचा खर्च वाढणार होता. तसा सुधारित प्रस्तावही पालिका प्रशासनाने एमएमआरडीएला सादर केला होता. नुकतीच एमएमआरडीएची १५३ वी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी ८१ कोटी ५३ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या सॅटीसच्या कामाला गती मिळणार आहे.