Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : मुंबईत क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगास जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची (आयआयसीटी) स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, त्याचा लौकिक जगभरात होणार आहे. आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधन व प्रशिक्षणात कार्यरत असेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मालाड येथे भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास होणार -
मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (INB) अखत्यारितील जवळपास २४० एकर जागेत भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल. या योजनेत केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन को-क्रिएशन मॉडेलद्वारे काम करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईला वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल बनवण्याचं स्वप्न सत्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या पुढाकारामुळे भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी मुंबई एक हब ठरणार आहे. पोस्ट प्रॉडक्शन, स्टुडिओज, फिल्म टेक्नोलॉजी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससारख्या आधुनिक सेवा आणि अभ्यासाचे वर्ल्ड क्लास सेंटर इथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईचं स्थान केवळ देशातच नव्हे, तर जगात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रमुख केंद्र म्हणून बळकट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.