Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : ‘एक गाव एक गोदाम’ योजना राबविणार; स्मार्ट रेशनकार्ड आता कोणत्याही राज्यातील...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहनांचे जिओ टॅगीग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

आगामी वर्षात 25 लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्या, 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी. तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लक्ष लाभार्थ्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.