Railway
Railway Tendernama
मुंबई

सिडकोकडून मिळणाऱ्या निधी अभावी रखडली खारकोपर टू उरण लोकल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिडकोकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे खारकोपर ते उरण लोकल रखडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील नेरुळ-बेलापूर-उरण लोकल प्रवास करणाऱ्यांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खारकोपर-उरण लोकल कॉरिडोरचे ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या चौथ्या कॉरीडोरचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, सिडकोकडून त्यांच्या वाट्याचा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कामावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले होते. वेळेवर निधी पुरवला तर मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पाचा ६७ टक्के वाटा सिडकोचा असून ३३ टक्के रेल्वेचा आहे. सिडकोद्वारे भूसंपादनानंतर काम वेगाने सुरू झाले होते. पण उरणपर्यंत टेकडी परिसर असल्यामुळे काम करणे कठीण जात आहे.

नेरुळ आणि खारकोपर-उरण हा एकूण २७ किमीचा दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉर आहे. पहिला टप्पा १२.४० किमीचा आहे. तर खारकोपर-उरणपर्यंतच्या १४.६९ किमी मार्गावर सध्या काम सुरू आहे. मुंबई ते उरण आणि न्हावाशेवा बंदर थेट लोकलला जोडण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर पनवेल-जासई-जेएनपीटी क्रॉसिंग लाईनही आहे.

मध्य रेल्वेच्या या चौथ्या कॉरिडॉरवर १० स्थानके आहेत. त्यामध्ये नेरूळ ते खारकोपर लोकल धावत आहेत. सध्या गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण स्थानकावर काम सुरू आहे. भूयारी मार्ग, पूल, उरणमधील पुलावर गर्डर टाकण्याची कामे सुरू आहेत. खारकोपर-उरण विभागात ५ स्थानके, २ मोठे पूल, ४६ छोटे पूल, ४ पुलाखालील पूल आणि ४ ओव्हर ब्रीज बांधले जात आहेत. सिडकोमार्फत निधी मिळण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत आहे.