Indian Railways
Indian Railways Tendernama
मुंबई

मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील 'या' 2 स्थानकांबाबत मोठा निर्णय...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रेल्वे स्थानकांच्या (Central Railway) देखभाल दुरुस्तीसह जाहिरातीसाठी मध्य रेल्वेने प्रथमच खुले टेंडर (Open Tender) मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उल्हासनगर स्थानक आणि कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या स्थानकांच्या देखभालीसाठी टेंडर मागवण्यात आल्या आहेत. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत दहा कंत्राटदारानी यात सहभाग घेतला. या कंत्राटदारांबरोबर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मुंबईतील सीएसएमटी मुख्यालयात पार पडली.

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर उत्पन्न आणि खर्चाचे दोन करार करण्यात आले आहेत. उत्पन्नाच्या करारामध्ये जाहिरात, पे अँड यूज, पे अँड पार्क, शुल्काच्या आधारे प्रतिक्षालयाचे व्यवस्थापन आदींचा समावेश आहे; तर खर्चाचे कंत्राट मुख्यत्वे साफसफाई, किरकोळ दुरुस्ती यांच्याशी संबंधित आहे. हे सर्व करार एकाच छताखाली आणण्याचा प्रस्ताव आहे.

मध्य रेल्वेने मुंबई विभागातील उल्हासनगर स्टेशन आणि पुणे विभागातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनससाठी स्वारस्य अभिव्यक्ती अर्ज मागवले आहेत. या करारांतर्गत परवानाधारकाने करारानुसार स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण, किरकोळ दुरुस्ती आणि देखभालीची कामे, पेंटिंग, बागकामे, लँडस्केपिंगची कामे करायची आहेत; तर उत्पन्नाचे करार म्हणजे स्टेशनवरील जाहिरात हक्क, पे अँड यूज, पे अँड पार्क, वेटिंग रूम/डॉर्मेटरीचे अपग्रेडेशन/देखभाल आणि व्यवस्थापन, क्लोक रूमचे संचालन आणि व्यवस्थापन, स्थानिक खाद्यपदार्थांच्या जाहिरातीसाठी फूड व्हॅनचे संचालन खुल्या टेंडरद्वारे केले जाईल.