मुंबई

Big News : इगतपुरीजवळ 'समृद्धी'वरील पूल कोसळला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-नागपूर समृद्धी लहामार्गातील शिर्डी-भरवीर ८० किमी लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा या महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी म्हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे. पाठोपाठ जुलैपर्यंत भरवीर ते इगतपुरी हा टप्पा सुद्धा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यासाठी या टप्प्याचे कामही सध्या वेगात सुरू असताना इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा पूल काम सुरु असताना अचानकपणे कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर पथावर सुरु आहे. इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून समृद्धी महामार्गावरून जाणारा बेलगाव तऱ्हाळे आणि गांगडवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी काम सुरू होते, तो समृद्धीचे काम सुरू असलेला रस्ता असल्याने तेथे वर्दळ नव्हती. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुलाच्या चार लेनचे पिलर एका उभ्या असलेल्या पिलरवरून दुसऱ्या पिलरवर बसविण्याच्या प्रयत्नात खाली आले. या पुलाचा जवळपास 200 ते 250 मीटरचा भाग अचानकपणे समृद्धी महामार्गावर कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, समृद्धी महामार्गाचे काम घाईघाईने उरकले जात असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी करीत आहेत.

नागपूर ते शिर्डीपर्यंत या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन हा टप्पा सुरु सुद्धा झाला आहे. सिन्नर पासून मुंबईपर्यंत काही ठिकाणी या महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. दरम्यान पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर पुलाचे काम करीत असलेल्या ठेकेदार 'जीव्हीपीआर' कंपनीचे वरिष्ठ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचा ढिगारा उचलण्यासाठी आधुनिक यंत्रणा बोलावली. पाच ते सहा जेसीबी, पोकलॅन, गॅस कटर आदींच्या सहाय्याने सुमारे 100 कामगार युद्ध पातळीवर ढिगारा उपसण्याचे काम करीत होते.