Bandra Skywalk
Bandra Skywalk Tendernama
मुंबई

BMC : दक्षिण मुंबईतील वर्दळीची 2 टोके स्कायवॉकने जोडणार; 40 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील वर्दळीचा भाग असलेला लोअर परळ पूल आणि मोनोरेलचे लोअर परळ स्थानक स्कायवॉकने जोडले जाणार आहे. मुंबई महापालिका त्यावर ४० कोटींचा खर्च करणार आहे.

लोअर परळ येथील पुलाच्या कामासाठी जानेवारी 2020मध्ये ठेकेदाराची नियुक्ती करून या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 114 कोटी रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. या बांधकामासाठी जीएचव्ही (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती आणि पावसाळा वगळून हे काम 18 महिन्यांमध्ये म्हणजे हे काम मार्च 2022पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु पश्चिम रेल्वेमार्फत या रेल्वेवरील पुलाचे काम विलंबाने सुरू झाल्यावर पावसाळा वगळून सहा महिने एवढा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे या पुलाचे बांधकाम ऑक्टोबर 2023पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या नियोजित वेळेत या पुलाचे बांधकाम पूर्ण होत नसून उलट या बांधकामाचा खर्च अंदाजे 40 कोटींनी वाढणार आहे तसेच कंत्राटदाराला आणखी 9 महिन्यांचा कालावधी वाढवून दिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोअर परळ येथील एक मार्गिका आधीच खुली करून देण्यात आली असून गणपत पाटील मार्गावरील पोहोच रस्त्याचे काम लवकर पूर्ण केले जाणार आहे, तर ना.म. जोशी मार्ग (दक्षिण) येथील पोहोच रस्त्याचे काम पश्चिम रेल्वेवरील पुलाचे काम झाल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. त्यातील एक मार्गिका नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम करताना या पुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसवणे तसेच पोहोच रस्त्याच्या बाजूवरील (सेवा रस्ते) मार्गाचे काम करताना पर्जन्य जलवाहिनीचेही काम केले जात आहे.