BMC
BMC Tendernama
मुंबई

'TATA', 'KEM'च्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी BMCचा मोठा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (BMC) परळ - हिंदमाताजवळ सरकते जिने असणारा मजबूत पादचारी पूल बांधणार आहे. यासाठी ४ कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे.

परळ भागात 'केईएम', 'टाटा', 'वाडिया' ही मोठी रुग्णालये आहेत. तसेच या परिसरात दोन्ही बाजूंनी फूटपाथलगत कपड्याची दुकाने व लोकवस्ती आहे. हिंदमाता परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आणि या परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपक्रमात हिंदमाता-परळ पूल जोडण्यात आल्याने वाहतूक कोंडी फुटली आहे. मात्र पादचाऱ्यांना परळ ब्रिजला किंवा हिंदमाता पुलाला वळसा घालून जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी दोन्ही पुलांच्या सखल भाग असलेल्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिंदमाता-परळ परिसरात पावसाळ्यात ठप्प पडणाऱ्या वाहतुकीवर उपाय म्हणून महानगर पालिकेने दोन उड्डाण पुलांत कनेक्टर तयार केला आहे. यामुळे हा परिसर पूरमुक्त झाला असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हिंदमाता व परळ उड्डाणपूल जोडल्याने वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. मात्र पादचाऱ्यांना परळ ब्रिजला वळसा घालून इकडून तिकडे जावे लागते किंवा चित्रा सिनेमा येथून वळसा घालून पलीकडे जावे लागते. त्यामुळे हा पादचारी पूल उपयुक्त ठरणार आहे. यामुळे 'केईएम', 'टाटा' रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.