Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

मुंबई : १ हजार किमीच्या नवीन वीजपुरवठा केबल; ३५०० कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित सुरु रहावा, यासाठी बेस्टमार्फत एक हजार किलोमीटरच्या नवीन केबल टाकण्यात येणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षांत नवीन केबल टाकण्याचे नियोजन असून, या कामासाठी ३,५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडे १० लाख ५० वीजग्राहक आहेत. यात आठ लाख निवासी तर दोन लाखांहून अधिक व्यावसायिक वीजग्राहक आहेत. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी पार पाडतात. वीजपुरवठा करणाऱ्या केबल जुन्या झाल्या असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी बेस्ट उपक्रमाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त होतात. वीजग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणे बेस्ट उपक्रमाची जबाबदारी आहे.

वीज मीटरचे रिडिंग होत नसल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आता स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास बेस्ट उपक्रमाच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्वरित मेसेज जाईल आणि वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक हजार किलोमीटरच्या नवीन केबल टाकण्यात येणार आहेत. तर २०० ते ३०० किलोमीटरच्या केबल बदलण्यात येणार आहेत.