मुंबई (Mumbai): रायगड जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक अलिबाग, रोहा, तळा तसेच परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. यामुळे या भागातील रस्ते दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम व सुरक्षित असणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अलिबाग-रोहा व तळा रस्त्याच्या कामांना गती देऊन ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, उपसचिव शैलेश बोरसे, कार्यकारी अभियंता अलिबाग मोनिका धायतडक, उपविभागीय अभियंता रोहा विजय बागुल, उपअभियंता सुधागड-पाली दिनेश पराते यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अलिबाग-रोहा व तळा या 85.60 किलोमीटर लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास हॅम HAM पॅकेज-01 अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे 64 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “रायगड जिल्ह्यात पर्यटनासोबतच औद्योगिक आणि स्थानिक वाहतुकीची मोठी गरज आहे. त्यामुळे दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते निर्माण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची उर्वरित कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.”
यावेळी रस्त्याच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पातील प्रलंबित कामे, वाहतूक व्यवस्थापन तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, रोहा, तळा परिसरातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून पर्यटन, व्यापार व स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.