Pune
Pune Tendernama
मुंबई

Ajit Pawar : अजितदादांचा मोठा निर्णय! आता करून दाखवणार 'हा' चमत्कार!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : लोणावळा (Lonavala) येथील टायगर, लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक (Glass Sky Walk) उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.

या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रिट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा.

उपमुख्यमंत्री पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, ॲम्पी थिएटर, खुले जिम आणि विविध खेळ आदी विविध सुविधा असणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवीन पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्ग संपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा.

शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर उंचीवर असून साधारण 1 हजार 200 एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी, तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.