मुंबई (Mumbai): शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील सावरोली (सो) ग्रामपंचायत हद्दीतील नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्पाची कहाणी म्हणजे सरकारी दिरंगाई, प्रशासकीय अडथळे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या अथक संघर्षाची गाथा ठरली आहे.
तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे, ज्यामुळे सावरोलीसह परिसरातील १३ गावपाड्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीला आता पाण्याची शाश्वत सोय उपलब्ध होणार आहे.
२००९ मध्ये सावरोली (सो) ग्रामपंचायत हद्दीतील नानी नदीच्या कुतरकुंड डोहाजवळ या प्रकल्पाचे काम सुरू झाले खरे, पण ते तात्पुरतेच ठरले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३८.९८ हेक्टर वनजमिनीची केंद्रीय वनविभागाची अंतिम मंजुरी न घेताच काम सुरू केल्यामुळे वनखात्याने ते तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. परिणामी, २०१० पासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आणि प्रकल्पाची फाइल 'लाल फिती'त अडकून पडली.
वनजमिनीच्या मंजुरीसाठीचा हा प्रवास सोपा नव्हता. अखेरीस, प्रकल्पासाठी लागणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात वाकला (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि साजे (ता. माणगाव, जि. रायगड) येथे वनविभागाला अनुक्रमे १०.२० व २८.७८ हेक्टर जमीन वर्ग करण्यात आली. ११ वर्षांच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर केंद्रीय वनविभागाने या हस्तांतराला हिरवा कंदील दाखवला आणि नामपाडा व आपटे ग्रामपंचायत क्षेत्रातील वनजमीन प्रकल्पासाठी वर्ग झाली.
प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरही निधीअभावी कामाला पुन्हा खिळ बसली. डिसेंबर २०२२ मध्ये या रखडलेल्या प्रकल्पाला प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. जलसंपदा आणि बांधकाम विभागाच्या सुधारित दरसूचीनुसार प्रकल्पासाठी एकूण ३८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, पण आर्थिक तरतूद न झाल्याने प्रत्यक्ष कामाला पुन्हा ब्रेक लागला.
आता मात्र, पाटबंधारे विभागाने गती घेतली आहे. खर्च झालेले १२ कोटी रुपये वगळता उर्वरित कामांसाठी २७ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, भातसा प्रकल्प वसाहत शहापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस नव्या ठेकेदार एजन्सीमार्फत उर्वरित मातीकाम, सांडवा आणि अन्य पूरक कामे पूर्ण करण्याची योजना आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. सु. शहाणे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच सर्व प्रक्रिया पूर्ण करून नामपाडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. १५ वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच १३ गावपाड्यांचे लक्ष लागून राहिलेला हा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.