Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

'भाजप बोले, बीएमसी चाले; भाजपच 5000 कोटींच्या टेंडरचा बोलविता धनी'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) शहरातील रस्त्यांसाठी एकाच दिवसात सुमारे पाच हजार कोटींची टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. ही टेंडर प्रक्रिया भाजपच्या मागणीनुसार राबवली जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन शर्मा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत प्रशासकांच्या अधिकारात एकाचवेळी इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर काढण्यामागे भाजपचे हित जोपासले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईतील रस्त्याच्या दुरावस्थेला इतके दिवस उलटल्यानंतर मुंबई महापालिकेला रस्त्यांचे टेंडर काढण्याची जाग आली आहे. मुंबईत सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी ५ हजार ८०० कोटींच्या टेंडर प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी सुरू केली. त्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महामार्ग बांधणीचा अनुभव असणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने प्रश्न केला आहे. मुंबई भाजपचा एक कार्यकर्ता पत्र लिहून मुंबईच्या रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा अनुभव असणाऱ्या मोठ्या कंपन्यांकडून रस्ते बांधण्याची मागणी करतो. त्या मागणीचा आधार घेत मुंबई महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली. अमित साटम महापालिकेला पत्र लिहितात आणि महापालिका कोट्यावधींचे टेंडर काढते. त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना महापालिका भाजपच्या लाईनवर चालत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेत ज्या पद्धतीने टेंडर निघताहेत त्यानुसार शिवसेना महापालिकेत नामशेष झाली आहे. याठिकाणी भाजपच्या मागणीनुसारच टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई महानगरपालिका भाजपने केलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील भांडणांमुळे सेनेतील कोणताच पदाधिकारी महापालिकेत सक्रीय नसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना सध्या अंतर्गत भांडणात व्यस्त असून त्यांना मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.