मुंबई (Mumbai): मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने बिहारमधील अनेक नागरिक कामानिमित्त किंवा उपचारांसाठी या शहरात येत असतात. अशा लोकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
बिहार सरकार मुंबईत दिल्लीच्या धर्तीवर एक अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त 'बिहार भवन' उभारणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामाला गती देण्यासाठी आता लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
हे नवे भवन मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेट म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात उभे राहणार आहे. सुमारे पावणेतीन हजार चौरस मीटर जागेवर ही ३० मजली इमारत साकारली जाईल. या इमारतीची उंची ६९ मीटर इतकी असेल. बिहारच्या भवन बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आधीच तयार केला असून, जागेची संरक्षक भिंत बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्यक्ष बांधकामासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या इमारतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी येथे राहण्याची स्वस्त आणि सुरक्षित सोय उपलब्ध असेल. इमारतीत १७८ खोल्यांसह २४० खाटांचे मोठे शयनगृह बांधले जाणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी वैद्यकीय कक्ष, उपाहारगृह आणि इतर मूलभूत सुविधा एकाच छताखाली मिळतील.
केवळ निवासच नव्हे, तर हे भवन आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना असेल. सौर ऊर्जा पॅनेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक गोष्टींवर येथे भर दिला जाणार आहे. मुंबईतील जागेची टंचाई लक्षात घेऊन येथे वाहनांच्या पार्किंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येईल. २३३ वाहने उभी राहू शकतील असे स्वयंचलित त्रिस्तरीय पार्किंग या ठिकाणी असेल.
याशिवाय, सरकारी कामकाज आणि महत्त्वाच्या बैठकांसाठी ७२ आसनांचे भव्य सभागृह आणि सुसज्ज कार्यालयेही या इमारतीत असतील. उद्योग आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. बिहार भवन बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात ऊर्जा बचतीला प्राधान्य दिले असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या प्रकल्पामुळे मुंबईत येणाऱ्या बिहारमधील प्रवाशांना हक्काचे आणि सोयीचे ठिकाण मिळणार आहे.