Thane
Thane Tendernama
मुंबई

ठाण्यातील 'हे' रुग्णालय कात टाकणार;६७५ कोटींचा पुर्नविकास प्रस्ताव

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय लवकरच कात टाकणार आहे. रुग्णालयाची श्रेणी वर्धित करण्याबरोबरच इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी ६७५ कोटींचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची उभारणी १९०१-०२ या कालावधीत करण्यात आली आहे. हे रुग्णालय ७२ एकर क्षेत्रात विस्तारलेले आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात १९ पुरुष, २० महिला कक्ष अस्तित्वात आहे. तसेच उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, बाह्यरुग्ण विभाग, वृद्धत्व सुविधा केंद्र, वसतिगृह इमारत यांसह ३२ नर्सेस निवासस्थान, जुने नर्सेस निवासस्थान या आणि अशा अन्य इमारती आहेत. या इमारती १२० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मनोरुग्णालयातील सोईसुविधांवर भार वाढत आहे.

पावसाळ्यात रुग्णांच्या खोल्यांमधील स्लॅब कोसळणे, भिंतींमधून पाणी झिरपणे आदी बाबींमुळे या इमारतींची दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे मनोरुग्णालयाची अत्याधुनिक व सुसज्ज अशी निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी सरकारकडून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ६७५ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

मनोरुग्णालयाच्या अंदाजपत्रकामध्ये एक लाख १२ हजार व ७४५ चौ.मी. बांधीव क्षेत्रफळासाठी सध्या २८ हजार ५०० चौ.मी. दर गृहीत धरण्यात आला आहे. त्यानुसार स्थापत्य कामाचा खर्च ३२५.३३ कोटी इतका येत आहे. त्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तरतूद, रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प तरतूद, सौरऊर्जा, अपंगांसाठी राम्प, पाणीपुरवठा पाईपलाईन व मलनिःसारण वाहिन्या, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, रस्ते, वाहनतळ आदींचा समावेश करून संपूर्ण प्रकल्पाची किंमत ६७५ कोटी इतकी होत आहे. त्यासंदर्भातील अंदाजपत्रक व आराखडे प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.